Join with us

Tuesday, 3 January 2012

इंटरेस्टींग पिंटरेस्ट

मी हस्तकलेचे, पाककृतींचे बरेच ब्लॉग्स फॉलो करते. त्यातले लेख, माहिती मला आवडली की त्या पोस्टची लिंक मी माझ्या एक एक्सेल फाईलमधे सेव्ह करून ठेवत असे. म्हणजे पुन्हा कधी तो लेख वाचायचा झाला तर एक्सेल फाईलमधे लिंक आयती उपलब्ध व्हायची. खासकरून हस्तकलेवरचे लेख यात जास्त असायचे. लेखांच्या वर्गवारीनुसार मी एकाच एक्सेल फाईलमधे अनेक शीट्स बनवून ठेवल्या होत्या. त्या त्या पोस्टची लिंक, त्या त्या वर्गवारीच्या शीटमधे सेव्ह करायची बस्स! मला हा प्रकार थोडा गैरसोयीचा, वेळखाऊ वाटायचा. कारण वर्गवारीनुसार नुसत्या लिंक्स सेव्ह करून ठेवल्या तरी त्या लिंकवरचं आपल्याला नेमकं काय वाचायचं होतं हे पुन्हा त्या फाईलमधे लिहून ठेवावं लागायचं, फोटोची लिंकदेखील सेव्ह करायला लागायची. नाहीतर काही दिवसांनंतर ती लिंक सेव्ह करून ठेवण्याचं प्रयोजन समजायचं नाही. पण माझी ही अडचण सोडवली Pinterest ने.Pinterest म्हणजे एक व्हर्च्युअल पिनबोर्ड आहे. यात आपण आवडलेल्या ब्लॉगची लिंक त्या लेखासोबतच्या फोटोसकट सेव्ह करू शकतो. म्हणजे समजा, मला एखाद्या लग्नसमारंभाची माहिती देणारी पोस्ट मला आवडली, तर त्या पोस्टची लिंक मी पोस्टसोबत उपलब्ध असलेल्या एका फोटोसोबत पिंटरेस्टवर पिन करू शकते. इतकंच नाही, तर त्या पोस्टच्या विषयानुसार किंवा वर्गवारीनुसार मी पिंटरेस्टवर बोर्ड्स देखील तयार करता येतात. व्हिडीओ पोस्ट करण्याची सुविधादेखील पिंटरेस्टने दिलेली आहे. ब्लॉगिंगशी संबंधित असलेल्या प्रत्येक विषय व वर्गवारीनुसार इथे बोर्डस तयार करता येतात. आता तुम्ही म्हणाल की याचा फायदा काय?


सर्वात महत्त्वाचा फायदा म्हणजे पिंटरेस्टवर तुम्हाला तुमच्या आवडत्या वर्गवारीनुसार बोर्ड तयार करता येतात. या बोर्डमधे तुमच्या आवडत्या पिन केलेल्या पोस्टची इमेज व लिंक दोन्ही दिसते. इतर पिंटरेस्ट वापरकर्त्यांनादेखील तुमच्या आवडी-निवडींचा परिचय होतो. त्यांच्याही आवडी-निवडी तुम्हाला कळतात. त्यांच्या बोर्डवरची आवडलेली एखादी इमेज किंवा पोस्ट तुम्ही तुमच्या बोर्डवर रिपिन करू शकता. त्यांना प्रतिसाद देऊ शकता व फॉलोदेखील करू शकता. याच्यातून होते माहितीची देवाणघेवाण आणि ज्ञानात पडते भर. अर्थात, प्रत्येक पिंटरेस्ट वापरकर्त्याचा प्रत्येक पिनबोर्ड आपल्याला आवडेलच असं नाही, यासाठी पिंटरेस्टने हव्या त्याच बोर्डला फॉलो करण्याची सुविधा देखील दिलेली आहे.

हे पिंटरेस्ट जॉईन कसं करायचं हा तुम्हाला प्रश्न पडला असेल, तर उत्तर अगदी सोपं आहे. तुमच्याकडे फक्त एक इमेल आयडी हवा. Pinterst.com वर गेलात की सर्वात आधी तुम्हाला असंख्य प्रकारच्या आकर्षक इमेजेस दिसतील. सर्वात वर तुम्हाला 'Request to Invite'’Login' अशी दोन बटणे दिसतील. तुमचं पिंटरेस्ट वर खातं नाही, असं गृहीत धरून चाललो तर तुम्हाला Request to Invite वर क्लिक करावं लागेल, म्हणजे तुम्हाला तुमचा ईमेल आयडी देण्यासाठी ’Requst Invitation' हा पर्याय मिळेल. तिथे रिकाम्या जागेत तुम्ही तुमचा हवा तो ईमेल आयडी दिला व ’Requst Invitation' वर क्लिक केलंत की काही क्षणांतच पिंटरेस्ट कडून तुम्हाला तुमच्या ईमेल आयडीवर आमंत्रण येईल. त्याचा स्वीकार करून तुम्ही पिंटरेस्ट वर खातं उघडू शकता. खातं उघडल्याबरोबर तुम्ही तुम्हाला आवडत असलेल्या इमेजेस पिन करायला सुरूवात करू शकता. तुमच्या खात्यामधे दिलेल्या Add+ या पर्यायावर क्लिक केलंत की तुम्हाला तीन पर्याय दिसतील - Add a pin, Upload a pin आणि Create a board. यातील पहिले दोन पर्याय इमेज पिन करण्यासाठी आहेत तर शेवटचा पर्याय हा पिन केलेल्या इमेजेसचं बोर्डवर व्यवस्थित संयोजन म्हणजे Organize करण्यासाठी आहे. Add a pin चा वापर करून पिंटरेस्टवर तुम्ही हव्या असलेल्या वेबलिंकवरची इमेज पिन करू शकता आणि Upload a pin वर क्लिक केलंत तर तुमच्या कॉम्प्युटरवरची इमेज तुम्हाला पिंटरेस्टवर पिन करता येईल. Create a board या पर्यायाचा वापर करून तुमच्या बोर्ड्सना तुम्ही हवं ते नाव देऊ शकता. तुमचा पिन बोर्ड कुठल्या वर्गवारीत बसतो, हे ठरवण्याचीही सुविधा पिंटरेस्टने दिलेली आहे. याच सर्व पर्यांचा वापर करून तुम्ही व्हिडीओजदेखील पिन करू शकता.

ही साईट इमेजेस आणि व्हिडीओजशी संबंधीत आहे, त्यामुळे इथे पिन करताना पाळावयाचे एटिकेट्स म्हणजे शिष्टाचार लक्षात ठेवा. उगाच भलतसलतं पिन केलंत किंवा कमेंट केलंत तर गच्छंतीची वेळ यायची. पिंटरेस्टच्या Help या पर्यायामधे वा.वि.प्र. ची उत्तरे दिलेली आहेत. त्यात फेसबुक व ट्विटरशी तुम्हाला पिंटरेस्ट कसं जोडता येईल, याचीही माहिती तुम्हाला आढळेल. इमेजेस सेव्ह करण्यासाठी पाच अग्रगण्य नि:शुल्क साईट्स नावाची एक पोस्ट मी पूर्वी लिहिली होती. पिंटरेस्टमुळे तुम्हाला काही चांगल्या इमेज साईट्सची माहितीदेखील मिळू शकेल.

नाना-विविध प्रकारच्या माहितीचा खजिना आणि तोही आकर्षक अशा इमेजेस सोबत आपल्या मित्रमैत्रीणींसोबत शेअर करायचा असेल, तर पिंटरेस्ट ही द बेस्ट साईट आहे. पिंटरेस्टप्रमाणेच आणखीही काही साईट्स आहेत. वुई हार्ट इट ही त्यातलीच एक. पण अजून या साईटबद्दल मला फारशी माहिती नाही त्यामुळे इथे काही लिहिणं योग्य होणार नाही. पण पिंटरेस्ट मात्र तुम्हाला नक्की आवडेल आणि उपयोगीदेखील पडेल याची मला १०१ टक्के खात्री आहे.

1 comment:
Write comments