Join with us

Friday, 16 April 2010

वॉटरमार्क म्हणजे काय?

स्वलिखित लेखाच्या प्रतिमेवर किंवा स्वत: काढलेल्या छायाचित्रावर हक्क दर्शवणारे पारदर्शक चिन्ह म्हणजे वॉटरमार्क.

वॉटरमार्क म्हणून स्वत:चं नाव, संकेतस्थळ अथवा ब्लॉगचा पत्ता किंवा स्वत:चं ओळखचिन्ह असं टाकता येतं. पाण्यासारखा पारदर्शक असूनही तो चटकन दिसून येतो म्हणून त्याला वॉटरमार्क असं म्हणतात. मूळ प्रतिमेवर वॉटरमार्कचं चिन्ह अगदी पुसटसं दिसतं. ज्यामुळे मूळ प्रतिमा कशी आहे हे समजतंच परंतु वॉटरमार्कचा जो पारदर्शक असा थर प्रतिमेवर असतो, त्यामुळे इतर कुणीही जेव्हा तुमचं छायाचित्र स्वत:च्या कामासाठी वापरू पहातो, तेव्हा तो सहजासहजी तुम्हाला फसवून तुमचं श्रेय लाटू शकत नाही.

अतिशय मेहनत घेऊन आपण छायाचित्र काढतो, स्वलिखिताच्या प्रतिमा प्रसिद्ध करतो. मात्र हे साहित्य इंटरनेटवर अपलोड झालं की कुणाच्याही दृष्टीस पडू शकतं आणि कुणीही ते स्वत:च्या कामासाठी उपयोगात आणू शकतं. ही कामं जशी वैयक्तिक व खाजगी स्वरूपाची असतात तशीच व्यायवसायिक स्वरूपाचीही असतात.या दोन्ही प्रकारच्या कामांमधून कुणाला तरी अर्थप्राप्ती होत असते व प्रसिद्धी मिळत असते. अशा कामांसाठी आपलं साहित्य वापरून आपल्या मेहनतीचं व कर्तृत्वाचं श्रेय इतर कुणाला तरी मिळून जातं व खरा हक्कदार अंधारातच रहातो. असं होऊ नये म्हणून आपलं जे काही साहित्य प्रसिद्ध करायचं असेल, त्यावर स्वत:चा वॉटरमार्क असणं आवश्यक आहे. वॉटरमार्क म्हणजे हे साहित्य कुणाच्या तरी अधिकाराखाली आहे आणि इतर कुणाही व्यक्तीला त्याचा वापर करायचा असल्यास त्या व्यक्तीला सर्वप्रथम हक्कधारकाची परवानगी घेणं आवश्यक आहे.

पूर्वीच म्हटल्याप्रमाणे वॉटरमार्कही दिसेनासा करून आपली छायाचित्रे वापरली जाऊ शकतात. मात्र वॉटरमार्क दिसेनासा करणं हे खूप कष्टाचं व वेळखाऊ काम आहे त्यामुळे वॉटरमार्क असालेली छायाचित्रे सहसा चोरीला जात नाहीत.

तुमच्या छायाचित्रांवर वॉटरमार्क असण्याचा आणखी एक मोठा अर्थ म्हणजे तुम्ही स्वत: एक व्यावसायिक कलाकार आहात व एका व्यावसायिक कलाकाराची छायाचित्रे त्याच्या परवानगीशिवाय स्वत:च्या कुठल्याही कामासाठी वापरणं हा दखलपात्र गुन्हा ठरू शकतो.

No comments:
Write comments