Join with us

Saturday, 17 April 2010

वॉटरमार्क बनविण्यासाठी आवश्यक गोष्टी

जर तुम्ही काढलेले छायाचित्र अथवा प्रतिमा कुणाला आवडली असेल, तर ते पैसे देऊन ती प्रतिमा व छायाचित्र खरेदी करू शकतात. अशा वेळी त्या व्यक्तिला वॉटरमार्करहीत मूळ प्रतिमा द्यावी लागते. म्हणून प्रतिमा व छायाचित्रे यांच्यावर वॉटरमार्क टाकण्यासाठी सर्वप्रथम एकाच प्रतिमेच्या दोन प्रती तयार कराव्यात. एक प्रतिमा मूळ प्रतिमा म्हणून स्वत:कडे किंवा आंतरजालावर सुरक्षित ठिकाणी ठेवावी.

प्रतिमेवर वॉटरमार्क टाकण्यासाठी संगणकात उपलब्ध असलेल्या पेंटब्रश या साधनाचाही उपयोग करता येतो. वॉटरमार्क तयार करण्यासाठी फोटोशॉपसारखे मूळ प्रतिमेत बदल वा सुधारणा करू शकणारे अत्याधुनिक सॉफ्टवेअरही काहीजण वापरतात. मात्र हे सॉफ्टवेअर खूप महाग आहे व सर्वसामान्यांच्या खिशाला परवडण्यासारखे नाही. फोटोशॉपला पर्याय म्हणून इंटरनेटवर एक सॉफ्टवेअर नि:शुल्क उपल्बध आहे. ज्याचं नाव आहे इंकस्केप (Inkscape). हे सॉफ्टवेअर पेंटब्रश व फोटोशॉपमधील काही महत्त्वाच्या गोष्टींची सांगड घालून तयार केलेलं आहे. हे सॉफ्टवेअर वापरून तयार केलेला वॉटरमार्कदेखील फोटोशॉप वापरून तयार केलेल्या वॉटरमार्कसारखाच दिसतो. इंकस्केप या सॉफ्टवेअरची माहिती मला श्री. तुषार जोशी, नागपूर यांच्याकडून मिळाली. इंकस्केप हे सॉफ्टवेअर डाऊनलोड करण्यासाठी येथे क्लिक करा.

इंकस्केप सारखंच पण फोटोशॉपच्या बरंच जवळ जाणारं एक सॉफ्टवेअर मला नेटभ्रमंती मधे सापडलं. या सॉफ्टवेअरचं नाव आहे स्प्लॅश अप (splashup). या सॉफ्टवेअरचा दुहेरी फायदा असा की हे सॉफ्टवेअर डाऊनलोड न करताही तुम्ही इमेज एडिटींग करू शकता आणि याला डाऊनलोडींगची सुविधा तर आहेच. शिवाय हे सॉफ्टवेअर वापरून एडिट केलेले फोटो तुम्ही पिकासा, फ्लिकर, फेसबुक व स्पॅश अपच्याही साईटवर अपलोड करू शकता.http://www.splashup.com ही या सॉफ्टवेअरची साईट आहे. या ठिकाणी तुम्ही गेलात तरवरच्या चित्रामधे दाखवलेला चौकोन तिकडे तुम्हाला दिसेल, तिथे हिरव्या रंगाने गडद केलेले Jump Right In असे शब्द दिसत आहेत, तिथे जर क्लिक केलंत तर तुम्ही हे सॉफ्टवेअर डाऊनलोड न करताही वापरू शकता. तर, त्याखालीच पिवळ्या रंगाने गडद केलेल्या Try Splashup Light या शब्दांवर क्लिक केलंत तर तुम्हाला ह्या सॉफ्टवेअरच्या डाऊनलोडींगचा पर्याय उपलब्ध होईल.इंटरनेटवर अशी बरीच सॉफ्टवेअर्स इमेज एडिटींगसाठी उपल्बध आहेत. आपण पेंटब्रशचा वापरही थोड्याफार प्रमाणात इमेज एडिटींगसाठी करू शकतो. अशा सर्व इमेज एडिटींग ऑनलाईन व ऑफलाईन सॉफ्टवेअर्सची माहिती मी एका स्वतंत्र लेखात देण्याचा नक्की प्रयत्न करेन.

No comments:
Write comments