Join with us

Sunday, 25 April 2010

ब्लॉगपोस्ट चोरी: चोर आणि शिरजोर

आपली ब्लॉगपोस्ट दुस-याच एका ब्लॉगवर पुन:प्रसिद्ध झाली आहे, असं पाहून तुम्ही अस्वस्थ होणं साहजिक आहे. तुम्ही विचार करत असाल की मागच्या लेखात सांगितलेल्या सर्व खबरदार्‍या घेऊनही जर पोस्टची चोरी होणारच असेल, तर या सगळ्या खटाटोपाचा फायदा काय? तर या खटाटोपामुळे तुम्ही तुमच्या लेखावर हक्क सांगू शकता. जर हक्कच सांगत आला नाही, तर पुढचा लढा कसा देता येईल?

आपल्या पोस्टच्या पुन:प्रसिद्धीची बातमी तुम्हाला समजली की तुम्ही काय करता? सर्वप्रथम त्या पोस्टचोराला एक ईमेल लिहिता. त्यात तुम्ही एकतर रागारागाने त्याचा धिक्कार केलेला असतो किंवा पोस्ट काढून टाकण्यासाठी विनंती केलेली असते. तो चोर जर सुज्ञ असेल, तर ताबडतोब ती बनावट पोस्ट काढून टाकतो पण जर तो हुशार असेल, तर तुमचा लेख स्वत:च्या ब्लॉगवरून काढत नाही. तो तिथे तुमचं नाव देतो म्हणजे तुमचा लेख जरी त्याच्या ब्लॉगवर प्रसिद्ध झाला, तरी नाव तुमचं आहे म्हटल्यावर तुम्ही काही करू शकत नाही. इथे तुम्हाला मनस्ताप होतो पण यापुढे त्या चोराचा पाठपुरावा करावा इतका वेळ आणि पुरावेही तुमच्याकडे नसतात. "आपलं नाव तर आलं ना, मग बास!", असा विचार करून तुम्ही तो विषय सोडून देता.

दुस-या प्रसंगात काय होतं की तुमचं ईमेल मिळालं की तो चोर त्याच्या मनात असलं, तर तुम्हाला उत्तर देतो. त्यात तो ’तुमचा लेख त्याच्या ब्लॉगवर कसा व का प्रसिद्ध झाला,’ या कारणाच्या समर्थनार्थ स्वत:च्या बुद्धीचातुर्याचे नमुने सादर करतो, क्वचित प्रसंगी तुम्हाला अपशब्द वापरतो. "नाही श्रेय दिलं लेखाचं तर काय करणार?" अशा आशयाचं सुप्त आव्हानही तुम्हाला देतो. हे सर्व न करता चोराने जर तुमच्या ईमेलकडे संपूर्ण दुर्लक्षच केलं तरीही तुम्हाला मन:स्ताप होतो पण यावेळेस तुम्ही त्या चोराचा पाठपुरावा करण्याचं ठरवता. मात्र इकडे चोरालाही आपलं चुकल्याची जाणीव होते आणि तो ते पोस्ट आपल्या ब्लॉगवरून एक तर डिलीट करतो किंवा तुमचं नाव त्या लेखाखाली देऊन मोकळा होतो. यामुळे तुम्ही त्या चोराची तक्रार करायला जाईपर्यंत पुरावे हातातून निघून गेलेले असतात आणि हा चोर नवीन चोरी करायला मोकळा रहातो.

अशा चोर आणि शिरजोर दोन्ही प्रकारच्या चोरांसाठी मी तुम्हाला हे प्रकरण अतिशय संयमाने व चातुर्याने हाताळण्याचा सल्ला देईन. त्यावेळेस सुरूवातीला कोणती पावले उचलावीत, हे पुढच्या लेखात पाहू या.

1 comment:
Write comments