Join with us

Wednesday, 7 April 2010

ब्लॉगपोस्ट चोरी: खबरदारीचे उपाय

प्रत्येक ब्लॉगर स्वत:चा ब्लॉग सुरू करतो ते आपलं मनोगत लिहिण्याकरता, आपल्यातील वैशिष्ट्ये, कलाकौशल्य, व्यवसायकौशल्य याची इतरांना ओळख व्हावी म्हणून. त्या अनुषंगाने ब्लॉगर्स स्वत: काढलेली छायाचित्रे, कथा, कविता, लेख, विनोद, इतर महत्त्वाची माहिती आपल्या ब्लॉगवर पोस्ट करीत असतात.

मात्र हल्ली ब्लॉगर्सचे लेख चोरीला जाण्याचे प्रकार वाढले आहेत. लेखातील ठराविक मजकूर, ब्लॉगर्सनी स्वत: काढलेली छायाचित्रे किंवा कधी कधी संपूर्ण लेखच चोरीला जातो. केवळ एखादा ब्लॉगरच अशी चोरी करू शकतो असं नाही तर काही संकेतस्थळं व प्रसिद्ध ऑनलाईन वृत्तपत्रही या मार्गाचा अवलंब करतात. अशा वेळी त्या संबंधित ब्लॉगरला व संकेतस्थळाला त्याच चोरी केलेल्या पोस्टखाली प्रतिक्रिया देऊन किंवा वृत्तपत्र संपादकाला दूरध्वनी करून काम झालं तर ठिक. नाहीतर आपलं लेखन हे आपलंच आहे, हे सिद्ध करण्याची वेळ कोणत्याही ब्लॉगवर येऊ शकते.

मुळात ब्लॉग ही विनामूल्य उपलब्ध झालेली सुविधा आहे. त्यामुळे कुणीही सहसा आपल्या ब्लॉगवरील लेखनाचे प्रताधिकार (Copyrights) सुरक्षित ठेवण्याच्या भानगडीत पडत नाही. कारण त्यासाठी पैसे मोजावे लागतात. "एखादा लेख गेला चोरीला तर जाऊ दे", अशीही काही ब्लॉगर्सची भूमिका असते. काही ब्लॉगर्स आपल्या ब्लॉगवर तळटीप म्हणून, "या ब्लॉगवरील कोणताही लेख इतरत्र प्रसिद्ध करण्यापूर्वी लेखकाची लेखी पूर्वपरवानगी घेणे आवश्यक आहे", अशा आशयाची तळटीपही लिहून ठेवतात. मात्र आपले लेख खरोखरच वाचनीय असतील, तर कुणाला ना कुणाला तरी ते कॉपी करण्याचा मोह हा होणारच.ह्या चोरीला आळा घालण्यासाठी काही ब्लॉगर्स आपल्या ब्लॉगवर कॉपी पेस्ट विरोधक कोड लावतात. माऊसचं राईट क्लिक अकार्यक्षम करणाराही कोड काही ब्लॉगर्स लावून ठेवतात पण तरीही तुमचा लेख चोरीला जातोच. तुमच्या ब्लॉगचं फीड ज्यांनी घेतलेलं असतं, त्यांच्यापैकी कुणीतरी चांगल्या भावनेने तुमचा लेख ईमेल मधे फॉरवर्ड करून आपल्या मित्रांना पाठवतात आणि तुमचा लेख तिथूनही चोरीला जाऊ शकतो. जेव्हा तुम्हाला तुमचा लेख चोरीला गेलाय हे कळतं, तेव्हा तर खूप उशीर झालेला असतो. तुम्ही फारतर संबंधित व्यक्तीला समज देण्यासाठी म्हणून फोन करू शकता अथवा ब्लॉग किंवा वेबसाईटवर प्रतिक्रिया देऊ शकता. मात्र जर त्या संबंधित व्यक्तिनेच हा लेख तुमचा आहे, हे नाकारलं तर? लेख तुमचा आहे हे सिद्ध करण्याइतका तुमच्याकडे पुरावा नसतो आणि वेळही. अशा वेळी तुम्हाला प्रचंड मन:स्ताप होतो.

या मन:स्तापापासून वाचायचं असेल, तर पुढील काही गोष्टी अवश्य करा:

१. तुमची प्रतिक्रिया तुमच्याच पोस्टवर:
ज्या ज्या वेळी तुम्ही तुमच्या ब्लॉगवर लेख पोस्ट करता, त्या त्या वेळी लेख प्रसिद्ध झाला की सर्वात पहिली प्रतिक्रिया तुम्हीच द्या. या लिंकवर जाऊन, त्या लेखाखालची प्रतिक्रिया वाचा.. हा लेख लिहून झाल्यावर मी जवळजवळ २० दिवसांनी या लेखावर प्रतिक्रिया देते आहे.एकवेळ ब्लॉगपोस्ट लिहिताना पोस्टची तारीख, वर्ष, वेळ बदलता येते पण प्रतिक्रियेच्या टाईम स्टॅम्पमधे कोणालाही बदल करता येत नाही. तुमच्या लेख छान असेल तर वाचकांच्या प्रतिक्रिया अगदी तत्पर असतात पण समजा काही कारणामुळे वाचकांना तुमच्या या लेखाची माहिती मिळाली नसेल, तर त्या लेखावर कुणाचीच प्रतिक्रिया असणार नाही व या गोष्टीच फायदा ब्लॉग पोस्ट चोर बरोबर उचलू शकतात. ब्लॉगवर लिहिलेली पोस्ट आपलीच आहे, असं दाखवण्याकरीता काही ब्लॉगर्स तुमची पोस्ट उचलून स्वत:च्या ब्लॉगवर टाकताना, दोन महिने मागची तारीख देऊनही पोस्ट करू शकतात. मात्र तुमच्या लेखाखाली जर तुम्ही प्रतिक्रिया दिली असेल, तर तो टाईमस्टॅम्प तुम्हाला तुमची ब्लॉगपोस्ट ही तुमचीच आहे, हे सिद्ध करायला मदत करू शकतो.

२. मराठी ब्लॉग विश्व:
तुमची जी जमेची बाजू आहे, ती म्हणजे तुम्ही मराठी ब्लॉगर असल्याने मराठी ब्लॉग विश्वचे सदस्य आहात. तुमच्या ब्लॉगवर लेख प्रसिद्ध झाला की काही क्षणांतच मराठी ब्लॉग विश्वला त्याची नोंद मिळते. तिथे तुमचा ब्लॉग रजिस्टर झाल्या झाल्या तुमच्या ब्लॉगच्या नावाचा एक स्वतंत्र प्रारंभबिंदू म्हणजेच नोड तयार होतो. त्या नोडवर तुमची ब्लॉगपोस्ट मराठी ब्लॉग विश्वला केव्हा मिळाली याचा तपशीलही असतो. हा नोडचा दुवा आणि त्यासोबत असलेला टाईमस्टॅम्पही तुम्हाला, तुमचं लेखन हे तुमचंच आहे, हे सिद्ध करण्यासाठी मदत करू शकतो.

३. ब्लॉग फीड:
तुमचं ब्लॉग फीड नेहमी Short ठेवा. संपूर्ण लेख ब्लॉग फिडमधून मिळत असला की तो तसाच्या तसा ईमेल मधून फॉरवर्ड करता येतो. शिवाय यामुळे आपल्या ब्लॉगवर थेट येणा-या वाचकांची संख्याही कमी होते. वाचकांनी थेट आपल्या ब्लॉगवर येऊन लेख वाचावे व ब्लॉगचा रिडर काउंट वाढावा असे वाटत असेल, तर फीड शॉर्ट ठेवणे अत्यावश्यक आहे. फीड म्हणजे काय व त्यासंबंधीची इतर माहिती इथे वाचा.

४.ऑनलाईन फ्री कॉपीराईट: इंटरनेटवर ऑनलाईन व विना़शूल कॉपीराईट मिळवून देणा-या ब-याच साईट्स आहेत. MyFreeCopyright किंवा Copyscape या त्यापैकी दोन. या दोनपैकी कुठल्याही साईटवर जाऊन तुमचा ब्लॉग रजिस्टर करा व त्यांचा बॅनर तुमच्या ब्लॉगवर लावा. तुमचा ब्लॉग तिथे रजिस्टर केल्यानंतर, तुम्ही प्रसिद्ध केलेल्या प्रत्येक ब्लॉग पोस्टची डिजीटल प्रत तुम्हाला ईमेलने येते. ही प्रत ईमेलमधेच सुरक्षितरित्या जतन करा. तुमच्या ब्लॉगवरील लेख तुमचाच आहे, हे सिद्ध करण्यासाठी ही डिजिटल प्रत फार उपयोगी पडू शकते.

५. छायाचित्रांवर व प्रतिमांवर वॉटरमार्क:
वॉटरमार्क हा पारदर्शक असल्यामुळे तो सहसा काढून टाकता येत नाही. मात्र फोटोशॉपसारख्या सॉफ्टवेअरचे माहिती असलेले, व्यावसायिकदृष्ट्या कुशल कलाकार मात्र या वॉटरमार्कलाही नाहीसं करून तुमची छायाचित्रं वापरू शकतात. पण छायाचित्र वॉटरमार्कसहित अपलोड होण्याचा अर्थच असा आहे की छायाचित्राचे हक्क कुणाच्या तरी स्वाधीन आहेत,. त्यामुळे सहसा कुणी दुस-याच्या संकेतस्थळावरील वॉटरमार्क असलेली छायाचित्रे वा इतर साहित्य स्वत:च्या नावावर खपवण्याचा खटाटोप करत नाहीत. वॉटरमार्क म्हणजे काय व तो कसा बनवावा इ. माहिती इथे वाचता येईल.

या गोष्टी अर्थातच, तुमच्या ब्लॉगवरून लेख किंवा छायाचित्रे चोरीला जाणं थांबवू शकत नाही. मोठमोठ्या साहित्यिकांनाही हा अनुभव आलेला आहे. आपण तर विनामूल्य पुरवलेल्या सुविधेवर ब्लॉग लिहितो. मात्र तुमचं साहित्य हे तुमचंच आहे यासाठी तुम्हाला अवश्यक असलेले पुरावे देण्याचं काम यामुळे सोपं होतं.

ज्यांना आपल्या ब्लॉगलेखनाचे प्रताधिकार सुरक्षित ठेवायचे नाहीत पण तरीही आपल्या लेखनावर मालकी सिद्ध करायची आहे, असे ब्लॉगर्स या युक्त्यांचा वापर करू शकतात. खबरदारी घेणं हे उपचारांपेक्षा केव्हाही चांगलं, नाही का?

एवढे खटाटोप करूनही ब्लॉग पोस्ट चोरीला जातेच, त्यावेळेस चोराची नेमकी भूमिका काय असते, हे आपण पुढच्या लेखात पाहू.

1 comment:
Write comments