Join with us

Monday, 15 December 2008

ब्लॉग म्हणजे काय?


Read this article in Hindi | English

जशी आपण Diary (रोजनिशी) लिहितो ना, अगदी तसंच आहे हे. फक्त ब्लॉग हा इंटरनेटवर असतो तर डायरी आपण घरात एका जागेवर आपल्या कपाटात किंवा टेबलवर ठेवतो. घरात ठेवलेली डायरी शक्यतो इतर कुणी वाचत नाही पण इंटरनेटवर ब्लॉगच्या माध्यमातून मांडलेलं मत किंवा विचार रोज शेकडो लोक वाचत असतात. म्हणूनच आपले विचार व कल्पना मांडण्यासाठी किंवा आपली सर्जनशीलता सादर करण्यासाठी ब्लॉग हे अत्यंत उत्तम व उपयुक्त असं व्यासपीठ आहे.

ब्लॉग प्रकाशनासाठी Blogger, Wordpress, Weebly सारखी अनेक व्यासपीठे उपलब्ध आहेत विनामूल्य उपलब्ध आहेत. ब्लॉग तयार करणं आणि त्यावर लिहिणं अजिबात कठीण नाही. आपण गुगल किंवा याहू वर जशी Email Id तयार करतो, मित्रांना इमेल पाठवतो, तितकंच सहज आणि सोपं आहे ब्लॉगिंग. इंटरनेटचं प्राथमिक ज्ञान आसलेली कोणीही व्यक्ती स्वत:चा ब्लॉग तयार करू शकते.

प्रत्येक व्यक्तीची ब्लॉग लिहिण्याची पद्धत मात्र त्या व्यक्तीच्या अभिरूचीवर आधारीत असते. काहीजण आपल्या कवितांचा ब्लॉग बनवतात, तर काहीजण राजकीय लेखन करतात, काहीजण प्रवासवर्णनं लिहितात, तर काही ब्लॉग्जवर शब्दश: रोजनिशी लिहिलेली असते आणि ती आवडीने वाचलीही जाते, बरं का! पण याचा अर्थ ब्लॉगवर नुसते लेखच लिहिता येतात असे नव्हे; तुम्ही स्वत: काढलेली छायाचित्रे, व्हिडीओ आणि संगीतदेखील प्रकाशित करू शकता. तुम्ही जर हा लेख वाचत असाल, तर आतापर्यंत तुम्हाला हे कळलं असेलच.

ब्लॉगवर एखादा लेख किंवा फोटो प्रकाशित करणे यालाच ब्लॉगिंग म्हणतात आणि ब्लॉगिंग करणाऱ्या व्यक्तीला ब्लॉगर असे म्हटले जाते.

ब्लॉगिंगचं स्वरूपदेखील झपाट्याने बदललं आहे. पूर्वी आपली ऑनलाईन रोजनिशी किंवा मिश्र , यादृच्छिक विचार लेखन यापुरताच ब्लॉगिंग मर्यादीत होतं. तेव्हा आपल्यासारखे सामान्य लोकच फक्त ब्लॉगिंग करत असतात. आता मात्र अनेक कलाकार, व्यावसायिक आणि अगदी राजकारणी देखील त्यांच्या फॅन्स व अनुययायांसोबत विचारांची देवाण-घेवाण करण्यासाठी ब्लॉग हे एक प्रभावी माध्यम म्हणून वापरतात.

जसं आपण डायरी लिहिताना काहीबाही doodling करतो किंवा थोडीफार नक्षी अगदी सहज म्हणून काढतो, ज्यामुळे डायरीचं ते पान आकर्षक दिसू लागतं, तसंच ब्लॉगचंदेखील आहे. निरनिराळ्या, आकर्षक टेम्पलेट्सद्वारे तुम्ही तुमचा ब्लॉग मनाप्रमाणे सजवू शकता. गंमत म्हणजे यासाठी तुम्हाला निराळे पैसे मोजण्याची गरज नसते. आहे की नाही मज्जा?

ब्लॉग व ब्लॉगिंगबद्दल इतकं ऐकल्यावर तुम्हालाही एखादा ब्लॉग तयार करावासा वाटत असेल ना? चला तर मग आपला पहिला ब्लॉग बनवू या.

1 comment:
Write comments